पूर्व उपनगरात महापालिकेचे (bmc) आणखी एक नवीन रुग्णालय लवकरच उपलब्ध होणार आहे. एमएमआरडीएने बांधलेले 410 खाटांचे (beds) हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
मल्टी स्पेशालिटी लल्लूभाई कंपाऊंड रुग्णालय 30 वर्षे चालवण्यासाठी खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. त्याकरीता पालिकेने निविदा मागवल्या असून त्याकरीता पालिका 11 कोटी खर्च करणार आहे.
परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खाजगी भागिदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) धोरण अवलंबण्याचे मुंबई (mumbai) महापालिकेने ठरवले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबतची घोषणा आगामी अर्थसंकल्पात केली आहे.
या धोरणाला आधीच शिवसेना (ठाकरे) प्रणित कामगार सेनेने विरोध दर्शवला आहे. मात्र पालिका प्रशासन आपल्या धोरणावर ठाम आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने एम पूर्व विभागातील मानखुर्दमधील (mankhurd) लल्लूभाई अमीचंद कंपाऊंड येथील नवीन रुग्णालय (hospital) चालवण्यासाठी व व्यवस्थापनासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत.
एमएमआरडीएने (mmrda) हे रुग्णालय बांधले असून नुकतेच ते पालिकेकडे हस्तांतरित केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नवीन रुग्णालय उपलब्ध होणार आहे. मात्र हे रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यास देण्याच्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेने आरोग्य विभागासाठी सार्वजनिक खाजगी भागिदारी धोरण आणण्याचे ठरवले आहे. मुंबई महापालिकेची विविध रुग्णालये, प्रसूतीगृहे दवाखाने आदींचे 30 वर्षे प्रचलन व परीक्षण करण्यासाठी म्हणजेच या आरोग्य सेवा चालवण्याकरिता इतर संस्थांकडे दिले जाणार आहे. त्याकरिता लवकरच इच्छुक संस्थाकडून अर्ज मागवले जाणार आहेत.
याअंतर्गत प्रथम मानखुर्दच्या रुग्णालयासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. तर त्यानंतर दहिसरचे (dahisar) भगवती रुग्णालय, बोरिवलीतील पंजाबी गल्ली चिकित्सा केंद्र (डायग्नॉस्टिक सेंटर) यांच्यासाठीही प्रस्ताव मागवण्यात येतील, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार यांनी दिली.
पालिकेच्या या धोरणाला भारतीय कामगार सेनेने विरोध केला आहे. हे धोरण म्हणजे खाजगीकरणाचा डाव असून यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना हटवून कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येणार आहे.
तसेच आरोग्य सेवा देताना मनमानी केली जाईल, असा आरोप कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केला. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अनेक वास्तू बांधून होतात, पण मनुष्यबळाऐवजी तेथे सेवा देता येत नाहीत. त्याकरिता हे धोरण आणण्यात आले आहे.
परंतु, पीपीपी धोरणांतर्गत 11 कोटी रुपये खर्च पालिका व्यवस्थापनासाठी करणार आहे. मात्र हा निधी संस्थेला एकाच वेळी दिला जाणार आहे का याबाबत बोलण्यास आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नकार दिला.
1) दहिसरमधील 490 खाटांचे भगवती रुग्णालय
2) बोरिवलीतील पंजाबी गल्ली चिकित्सा केंद्र (डायग्नॉस्टिक सेंटर)
3) माहीमचे जाखादेवी आरोग्य सुविधा केंद्र
4) विक्रोळी पार्कसाईट रुग्णालय
5) देवनारमधील 300 खाटांचे रुग्णालय एमएमआरडीएकडून हस्तांतरित होणार
हेही वाचा